Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आषाढ अमावस्या (गटारी अमावस्या ), दिवा पुजन, २६ जुलै २०१४ ला"आषाढ अमावस्या" आहे .

आषाढ अमावस्या म्हटले कि सहसा कुणाच्या लक्षात येणार नाही, पण " गटारी " आमावस्या सगळ्यांनाच माहित आहे. भारतीय संस्कृती गटारीचे महत्त्व किती जाणते याचे हे उत्तम उदाहरण.

गटार अशुद्ध पदार्थ वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते,

पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईनाशी झाली. गटारे स्वच्छ होण्यापेक्षा ती अशुद्ध होण्याचा वेग अधिक वाढला आणि गटारांमुळे रोगराई वाढू लागली.

आषाढ महिना हा रोगराईचा महिना समजला जातो.
ती होऊ नये म्हणून पूर्वापार देवामातांची आराधना होई; त्या प्रसन्न व्हाव्यात यासाठी विधी केले जात. आताच्या विज्ञान युगात गटारे स्वच्छ ठेवली, त्यात घाण तुंबू नये अशी व्यवस्था केली, तर रोगराई आपोआप वाहून जाईल, प्रसन्न श्रावण महिन्याचे आगमन होईल.

'गटारी'ची आठवण त्यासाठी ठेवायची !

आषाढ अमावस्या हि "तमसो मा ज्योतिर्गमय" असा संदेश घेऊन येणारी मंगलमय मानली जाते. हा दिवस दिव्यांची अमावस्या साजरा केला जातो. या दिवशी घरातील दीप -निरांजन-कलश इत्यादी पूजेचे साहित्य धून- घासून-पुसून ठेवावे हे मुख्य काम त्या दिवशी असते. ह्या दिवशी दिव्याची पूजा करतात. कारण श्रावण दुसर्या दिवसापासून चालू होणार असतो व हा अत्यंत पवित्र धार्मिक महिना असतो. ह्या महिन्यात वेग वेगळी पूजा, व्रत वैकल्य,अभिषेक केले जातात. त्यामुळे ह्या सर्वासाठी जे पूजा साहित्य लागते ते पुन्हा जरा घासून पुसून लक्ख करणे हा त्यामागचा उद्देश असतो. अशा गोष्टी काढून त्या साफ करून श्रावण महिन्यासाठी सज्ज करणे हा त्याचा उद्देश आहे. या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. या दिवशी जिवती पूजनही करतात.

"दिव्यांची अवस", जरी खरं असल तरी आज किती जणांना हे माहित आहे ?
किंवा किती जण ही  अमावस्या या पध्दतीने साजरी करतात?
या इतक्या सुंदर दिनाला "गटारी" हे नाव कुणी दिले कुणास ठाऊक.

सध्या गटारी म्हणजे दारु, मटण, चिकन, मासे यांच्यावर आडवा हात मारणे. यामुळेच ही अमावस्या बदनाम झाली आहे. मद्यसेवन करून गटारात लोळणे हीच खरी गटारी अशी समजूत झाली आहे.  काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबर सारखेच या दिवसा कार्यक्रम आखले जातात.

श्रावण महिन्यात मांसाहार साधारणपणे केला जात नाही. पुढील संपुर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरु होण्यापुर्वीच्या अमावस्येदिवशी भरपेट मांसाहार करुन पुढील महिन्याची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. कारण श्रावणात धार्मिक कार्य जास्त असल्याने असा मांसाहार केला जात नाही.

श्रावणात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते. या दिवसात वर्षभर न दिसणार्या रानभाज्या बाजारात येतात, निसर्गातील ताजेतवाने पणा, मनाची प्रसन्नता, आणि संयमित आहार विहार म्हणजे सदा सर्वकाळ श्रावण असणे होय.

समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात. माशांचा प्रजोत्पादन काळ व माशांची सशक्त पैदास होण्याकरीता तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू काही सृष्टीने मानवाला एक छोटासा ब्रेक दिला आहे.

विविध रान वनस्पती ह्या निरनिराळे रसस्वाद देतात त्यांचा ही पोषकपणा शरीरास मिळणे जरुरीचे असते. याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात आणि पावसाचे दिवस असल्याने मांसाहार पचायला देखील जड असते. म्हणुनच या महिन्यात मांसाहार वर्ज्य मानला जातो.

आता तुम्हीच ठरवा आषाढ अमावस्या कशी साजरी करायची.

दिव्यांची पूजा बांधून की गटारात लोळण घेऊन…..!!!

Popular Articles