Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एका ख्यातनाम वक्त्याने हातात पाचशेची नोट फडकावीत भाषणाला सुरुवात केली. समोर बसलेल्या शेकडो श्रोत्यांना त्याने प्रश्न केला,"ही पाचशेची नोट कुणाला हवी आहे?"

हळूहळू करता करता असंख्य जणांनी हात वर केले.

मग तो वक्ता म्हणाला, "आपणापैकी कुणा एकालाच मी ही पाचशेची नोट देणार आहे, पण त्यापूर्वी मला हे करू
द्या." असं सांगत त्याने ती नोट चुरगाळून टाकली आणि पुन्हा श्रोत्यांना प्रश्न केला, "आता ही नोट कुणाला हवी आहे?"

श्रोत्यांमधून पुन्हा एकवार असंख्य हात उंचावले. "अच्छा ! आणि मग मी असं केलं तर?" असं म्हणून त्यानं ती नोट पायदळी तुडवली आणि हाताने उचलून मातीने मळलेली आणि पूर्ण चुरगळलेली ती नोट सर्व श्रोत्यांना दाखवीत पुन्हा प्रश्न केला, "आता ही नोट कुणाला हवी आहे?" श्रोत्यांमधून तरीही पुन्हा एकवार असंख्य हात उंचावले.

मग त्या वक्त्याने या घटनेचं निरूपण केलं, "आज आपण एक आयुष्यातला खूप मोठा धडा शिकलो आहोत. या नोटेबाबत मी काय वाट्टेल ते केलं, तरीही ही नोट स्वीकारण्याची तुमची तयारी होती. कारण या नोटेसोबत मी काहीही केलं- म्हणजे तिला चुरगळलं, पायदळी तुडवलं तरी तिचं पाचशे रुपये हे मूल्य अबाधित आहे, याची जाणीव तुम्हाला होती.

आयुष्यात खूप वेळा असं घडतं, की आपण घसरतो, पडतो, हरतो. खूप वेळा आपले निर्णय आपणाला जमीनदोस्त करतात आणि आपणाला वाटू लागतं की, आपली काहीच किंमत नाही. पण आपणासोबत जे झालं किंवा भविष्यात जे काही होणार आहे, त्यामुळे आपली किंमत कमी होणार नाही, याची स्वतःच्या मनात खात्री बाळगा.

भूतकाळातील काळोखाचा भविष्यातील उषःकालावर परिणाम होऊ देऊ नका. तुमचं आयुष्य ही तुम्हाला मिळालेली अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. आयुष्यातील पडझडींनी त्याचं मूल्य तसूभरही कमी होणार नाही."

Popular Articles